तशी मी लोकमान्य टिळकांची लहानपणापासूनच खूप मोठी भक्त आहे..सांगायचं झालं तर असं की जेव्हा कधी दादा जेवण करून उठला की आई नेहमी सांगायची जेवण झालं की तुझं आणि दादाचं ताट धुवून ठेव आणि माझं मात्र उत्तर ठरलेलं असायचं..टिळकांनी सांगितलं होतं की,”मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी त्याची टरफल उचलणार नाही.” आई समजून जायची की ही कार्टी ताट काही उचलणार नाही.ती म्हणायची असो या तुम्ही परत म्हणायची.असे कित्येक किस्से आहेत जे मी तुम्हाला सांगू शकते पण असो.
मी या आधी पण खूप वेळा “लोकमान्य – एक युगपुरुष” हा चित्रपट पाहिला आहे,पण आज पुन्हा एकदा पहायची संधी मिळाली आणि खरंच अभिमान वाटला नाही म्हणणार पण अभिमान आहे आपल्या देशातील क्रांतिकारी चळवळीचा आणि इतिहासाचा पण.त्यावेळी टिळकांनी एखादा श्रीमुखात ठेऊन द्यावा असा प्रश्न इंग्रज सरकारला विचारला होता; “या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?” तो प्रश्न चित्रपट संपल्यानंतर ही माझं डोकं काही केल्या सोडत नव्हता.
कशातच मन लागत नव्हतं,शेवटी डायरी आणि पेन घेऊन स्वतःच स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आजची परिस्थिती पाहता सगळंच बिकट झालं आहे.दोन वेळ नाही पण एक वेळ जरी सुखाचा घास खाता आला तर देव पावला वाटत आहे.जगणे अवघड मरणे सोपे असा काहीसा समीकरणाचा भाग झाला आहे आयुष्यात. कोरोना ची साथ आली आणि सगळे जीवनच हादरवून गेलं आहे.कधी ही झालं तरी आपण राजेशाही अनुभवलेले लोक आहोत.आज संकट आले आहे म्हणजे लोक विचार करतात,जनतेची सुरक्षा हा राजाचा धर्म आहे.पण सध्याची ती कोविड केंद्रांची अवस्था पाहिली की लोकांना वाटतं;आम्ही मतदान करताना चुकलो का?अहो किती अजून एकमेकांवर ताशेरे ओढण्यात वेळ घालवणार खरंच तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?गरीब जनता भरडली जात आहे आणि तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार आहात का?प्रत्येकजण आज डॉक्टर लक्ष देत नाहीत फक्त पैसे घेतात,थोडी कमी करा फी म्हणून डॉक्टर ना दूषणे देतात.पोलिसांना काय काम आहे फक्त काठ्या मारता येतात आणि गरीब जनतेवर अत्याचार करतात.असे प्रश्न लोक उपस्थित करतात आणि चुका दाखवतात.
चूक मुळात कोणाची ह्यावर मला बोलायचंच नाही.फक्त एकदा विचार करावा माझ्या देशवासीयांनी की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणायच्या आधी मला ते बोलायचा अधिकार आहे का?हा प्रश्न आरशासमोर उभा राहून स्वतः ला एकदा विचारावा.
उत्तर प्रत्येकाचं प्रत्येकाला मिळेल.
एक हजार अथवा दोन हजार मिळवण्यासाठी तुम्ही किती मोठी चूक करता आणि खऱ्या अर्थी तुमच्या नेत्याला जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही गमवून बसता.आणि जेव्हा डोळे उघडतात तेव्हा सगळं आयुष्य बदलून गेलेलं असतं आणि समोर फक्त अथांग पसरलेला संतापाचा समुद्र असतो जिथून माघार कधीच शक्य नसतो.
त्यामुळे क्षणभंगुर मोहाला बळी न पडता आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या हक्काचा खरा अर्थ समजून घेऊन देशाचे एक सुजाण नागरिक बनून तुम्ही मतदान करावे एवढीच फक्त इच्छा!!!
झोपी गेलेला जागा झाला.
